प्रगती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पंचवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा


प्रगती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पंचवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा

  • शिक्षक, विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
    पुणे ः दहावीच्या परीक्षेपूर्वी निरोप घेतलेल्या हडपसर येथील प्रगती महाविद्यालयातील शाळेतील माजी विद्यार्थ्यांची शाळा 25 वर्षांनी पुन्हा भरली. प्रगतीच्या शिलेदारांचे स्नेहसंमेलन हा कार्यक्रम रविवारी (दि. 23) मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षक आणि सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
    यावेळी शिक्षक शिवाजी चव्हाण, सुभाष भारद्वाज, एन. एम. कुंडीयावाला, अरुण झांबरे, निजाम शेख, विठ्ठल कोंडे, संजय पाटील, भारत कदम, लक्ष्मण कणसे, सरोज अस्मर, रामचंद्र गाढवे रेखा आबनावे तसेच शाळेतील सध्याच्या शिक्षिका कोलते मॅडम आणि शिक्षेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी विद्यार्थ्यांना शिकवणारे काही शिक्षक निवृत्त झाले ते गावाला असतानाही त्यांनी पुण्यात येऊन कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. तर बाहेर गावी असलेली मुले तसेच सासरी नांदत असलेल्या मुलींनीही मुंबई, सोलापूर तसेच इतर भागातून येऊन कार्यक्रमास हजेरी लावली. रविवारी सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमाची सुरवात काळेपडळ येथील शाळेच्या प्रांगणात राष्ट्रगीताने झाली. क्रीडा शिक्षिका रेखा आबनावे यांनी सर्वाना राष्ट्रगीतासाठी रांगेत उभे केले. राष्ट्रगीतानंतर सर्व माजी विद्यार्थी वर्गात जाऊन बसले. त्या ठिकाणी लक्ष्मण कणसे सरांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. त्यानंतर सर्वजण पुन्हा एका शाळेच्या प्रागंणात कार्यक्रमासाठी हजर झाले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. यामध्ये सध्या कोण काय करतंय याबद्दल माहिती दिली. यापरिचयामधून त्यावेळचे आपले सहकारी कोणी डॉक्टर, कोणी इंजिनिअर तर कोणी मोठे व्यावसायिक झाल्याचे समजले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात साजिद सय्यद, संपदा शेळके -लावंड, संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या जुन्या आठवणी डोळ्या समोर उभ्या केल्या. तर उपस्थित सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचे डोळेही पानवल्याचे दिसून आलेे. आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींची 25 वर्षांनंतर भेट झाल्यामुळे हा दिवस सर्वांसाठी एखाद्या सणाहून कमी नसल्याचे यावेळी पहायला मिळाले. यावेळी मुलींनी शिक्षकांचे पाद्यपुजनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल तोष्णीवाल, निर्मला इंगळे-तापकीर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी माजी विद्यार्थी प्रितम जगताप, जुबेर पठाण, विकास हांडे, बापु हांडे, मयूर गायकवाड, महेंद्र कांबळे दत्ता ताम्हाणे, वर्षा जगताप, झीनत शेख, विजय यादव, प्रियंका शिंदे -भोसले, स्वप्ना खोले -नाझरे, जया होले, अमृता नाझरे, निलेश भोसले यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी सांभाळली. सायंकाळी चार वाजता पुन्हा भेटू या वाक्यावर कार्यक्रमाची सांगता झाली, अन सर्वांचे पाय पुन्हा आपल्या वाटेकडे वळले.

प्रगती महाविद्यालयाच्या प्रगतीचे शिलेदार या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थिती लावलेले शिक्षक आणि माजी विद्यार्थी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *