शासकीय तंत्रनिकेतन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
*शासकीय तंत्रनिकेतन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन*
पुणे, दि. 13: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथील महिला तक्रार निवारण समितीच्या पुढाकाराने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी विद्यार्थिनी आणि महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष नमिता कदम, सदस्य डॉ. शुभांगी शिंदे, ललिता कोरडे, पल्लवी सरोदे, रुपाली पाटील व स्नेहल खडसे आदी उपस्थित होते.
महिलांच्या सक्षमीकरणाचे व छंद जोपासण्याचे महत्त्व विशद करुन श्रीमती कदम यांनी, महिलांनी शिक्षण आणि करिअरमध्ये पुढे येण्यासाठी आत्मविश्वास बाळगावा. तसेच, समाजात महिलांना अनेक संधी असून आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जावे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे. शिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करून महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. महिलांना व्यक्तीगत आयुष्य व कार्यालयीन समतोल कसा साधावा यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. पाटील व श्रीमती कदम यांच्या हस्ते संस्थेतील महिलांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेतील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.