कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन सबंधित सर्व घटकांनी उत्कृष्ट काम करावे – पणनमंत्री जयकुमार रावल
*कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन सबंधित सर्व घटकांनी उत्कृष्ट काम करावे – पणनमंत्री जयकुमार रावल*
*‘स्मार्ट’ प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेचा पुण्यात समारोप*
पुणे दि.10: राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन विभागाचे अधिकारी तसेच बाजार समित्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने उत्कृष्ट अर्थात ‘स्मार्ट’ काम करावे, असे आवाहन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
श्री. रावल हे यशदा येथे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यामधील बाजार समित्यांचे अधिकारी, सचिव आणि पणन विभागाचे अधिकारी यांच्या क्षमता बांधणीसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे पणन संचालक विकास रसाळ, माजी पणन संचालक सुनिल पवार, यशदाचे संचालक प्रदीप गारोळे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील आणि पणन संचालनालयातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. रावल पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे कृषी क्षेत्रात देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. शेतकऱ्याला शेती उत्पादन करण्याहून उत्पादित कृषीमालासाठी चांगल्या बाजारपेठेचा शोध घेऊन विक्री करणे अवघड जाते. त्यामुळे पणन विभागाने शेतमालाच्या मूल्य साखळीमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतमालाची नासाडी कमीत कमी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळेमधून मार्गदर्शन व्हावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पणन संचालक श्री. रसाळ म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि विभागाचे अधिकारी एकत्रितपणे काम करतील. शेतकऱ्यांना स्मार्ट प्रकल्पाचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळांचा सकारात्मक फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी पणन संचालक श्री. पवार यांनीही पणन विभागाच्या चांगल्या कामकाजा संदर्भाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेबाबत आखाडा बाळापूर आणि डहाणू बाजार समितीच्या सचिवांनी मनोगत व्यक्त केले. पणन विभागाशी संबंधित अतिशय चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण प्रथमच स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून मिळत असल्याने समाधानी असल्याचे मनोगत यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्री श्री.रावल यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशदाचे संचालक श्री. गारोळे यांनी केले.