मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साधला साहित्यिकांशी संवाद
*मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साधला साहित्यिकांशी संवाद*
*विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल- मंत्री उदय सामंत*
पुणे, दि. १०: आगामी विश्व मराठी संमेलना च्या अनुषंगाने साहित्यिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. सामंत यांनी यावेळी दिली.
फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित या संवादास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गणेश चंदनशिवे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे, असे सांगून मंत्री उदय सामंत म्हणाले, मुंबई, त्यानंतर वाशी आणि आता पुणे येथे हे संमेलन होत आहे. ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवस फर्ग्युसन महाविद्यालय येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्री श्री. सामंत यांनी पुढे माहिती दिली, या साहित्य संमेलनात मराठीसाठी मोठे योगदान दिलेले एक ज्येष्ठ साहित्यिक त्याचबरोबर एक नवीन लेखकाचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. त्याशिवाय मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व समित्यांचा, त्यातील साहित्यिकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
श्री. सामंत पुढे म्हणाले, या संमेलनात बाल साहित्यापासून, महिला, युवक, बुजूर्गांपर्यंत अशा सर्वांनाच समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच मराठीसाठी योगदान दिलेले परंतु, काही कारणामुळे ते पुढे येऊ शकले नाहीत अशांनाही या संमेलनात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. विश्वातील मराठी भाषिकांनीही या संमेलनात त्यांच्या इच्छेने आणि शासनाच्या प्रयत्नाने समाविष्ट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
संतसाहित्य, अभंगवाणी, लोककला, महिला साहित्य, बालसाहित्य, मराठीतील आधुनिक प्रवाह, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गीतांवर आधारित गीते, भावगीते आणि आधुनिक गीते अशा विविध टप्प्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आदींवर भर देण्यात येणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील भव्य प्रेक्षागृहात युवा पिढीसह विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवर कार्यक्रम आयोजित करता येतील. वाचन संस्कृतीला चालना द्यावी यासाठी पुस्तकांच्या 100 स्टॉलचे नियोजन करण्यात आले असून त्याहून अधिक स्टॉल लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रस्ताव गतीने पाठविण्यात येणार आहे. याशिवाय अभिजात भाषेत समाविष्ट झालेली प्राकृत ही भाषादेखील मराठीचे मूळ असल्यामुळे त्यातील वाटादेखील मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.
मराठी भाषा विभागाने ‘लायब्ररी ऑन व्हील्स’ ही संकल्पना विभागस्तरावर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर पुढे ती जिल्हास्तरावर कशी राबविता येईल यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. उद्योग आणि मराठीला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असून उद्योगांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) ग्रंथालयांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निधी द्यावा यासाठी प्रयत्न सुरू ओहत. ग्रंथालयांच्या विकासासाठी त्यांच्या स्थापनेच्या कालावधीनुसार वर्गीकरण करुन त्यांना पुस्तके, फर्निचर, साधनसामुग्रीच्या विकासासाठी निधी मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशीही माहिती श्री. सामंत यांनी दिली.
यावेळी विविध साहित्यिकांनी साहित्य संमेलनात संत साहित्य, लोककला, स्त्रीसाहित्य, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मराठी भाषेची सांगड, मराठी पुस्तकांचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद, मुद्रित शोधन, समाजमाध्यमांवर दर्जेदार मराठी लेखन, मराठीतून दर्जेदार रील्स बनविणे आदींच्या अनुषंगाने चर्चासत्रे ठेवणे आदींबाबत सूचना मांडल्या. त्याबाबत सकारात्मक राहून संमेलनात समाविष्ट करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री. सामंत म्हणाले.
बैठकीनंतर मंत्री श्री. सामंत यांनी विश्व मराठी संमेलन होणाऱ्या जागेची पाहणी करुन विविध सूचना केल्या.
बैठकीस योगी निरंजन नाथ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. माधवी वैद्य आदींसह विविध साहित्यिक, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागाच्या प्रमुख प्रा. रुपाली शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांच्या मराठी भाषा विभागांचे प्रमुख उपस्थित होते.