खेड तालुक्यात ‘पाणलोट यात्रे’ चे आयोजन
खेड तालुक्यात ‘पाणलोट यात्रे’ चे आयोजनखेड तालुक्यात ‘पाणलोट यात्रे’ चे आयोजन
पुणे, दि. ९ : केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या योजनेच्या १४० प्रकल्प क्षेत्रातील ३० जिल्ह्यातील गावांमध्ये ‘पाणलोट यात्रेचे’ आयोजन करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील कनेरसर आणि गुळाणी येथे पाणलोट यात्रा आयोजित केली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली.
‘पाणलोट यात्रा’ यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित जिल्हास्तरीय समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा स्तरावरील समिती सदस्य तथा रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी चारुशिला मोहिते देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, भूजल विभाग, वनविभाग, जिल्हा परिषद विभाग, सामाजिक वनीकरण विभागांच्या अधिकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी, खेड जिल्हा प्रकल्प समन्वयक आदी उपस्थित होते.
श्री. मापारी म्हणाले, पाणलोट चळवळीविषयी स्थानिक समुदायामध्ये जागरुकता निर्माण करणे, लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीसाठी चालना देणे या उद्देशाने ‘पाणलोट यात्रा’ सुरु करण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून मृद व जलसंरक्षण आणि संधारणाची शपथ घेणे, मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे, पाणलोट कामांवर श्रमदान करणे, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करणे, पूर्ण झालेली कामे दत्तक घेण्यास स्थानिक शाळांना प्रोत्साहन देणे, धरणीताई व पाणलोट योद्धा यांची निवड करणे आदी कार्यक्रम या यात्रेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.
पाणलोट यात्रेत राबविण्यात येणा-या सर्व कामांचे सूक्ष्म नियोजन करुन या उपक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गटातील महिला, स्वयंसेवी संस्था व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच पाणलोट यात्रेचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येणार असल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा सहभाग असणार आहे, असेही श्री. मापारी यांनी सांगितले.