स्वामित्व योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मालमत्ता पत्रक सनद वाटप कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन
*स्वामित्व योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मालमत्ता पत्रक सनद वाटप कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन*
पुणे दि.२७: स्वामित्व योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करुन देताना ‘दस्तऐवजाचा हक्क’ अर्थात सनद देण्यात येत असून याबाबतचा जिल्हास्तरीय सनद वाटप कार्यक्रम शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषद पुणे येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी भारत सरकारचे सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या गृह (शहरे), नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्र्यांचे ऑनलाईन संबोधन दाखविण्यात येणार आहे.
राज्य महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करुन देताना ‘दस्तऐवजाचा हक्क’ प्रदान करण्यात येत आहेत. या योजनेमध्ये ड्रोनद्वारे हवाई मॅपींग करून गावठाणातील मिळकतींचे नकाशे तयार करण्यात येतात. सदर नकाशांचे ग्राऊंड ट्रथींग करून हक्कचौकशी अंती मिळकतींच्या सनदा व मिळकतपत्रिका तयार करण्यात येतात.
स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत मालमत्ता विषयक कागदपत्र उपलब्ध झाल्याने ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सक्षम बनविले आहे. याचाच एक भाग म्हणून २७ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री हे ५० लाख मालमता पत्रकांचे आभासी (ऑनलाईन) वितरण करताना लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत.
या आभासी कार्यक्रमानंतर जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये प्रॉपर्टी कार्डचे प्रत्यक्ष वितरण करावयाचे आहे. पुणे जिल्हातील १३ तालुक्यामधील १ हजार १४९ गावांना स्वामीत्व योजना लागू करण्यात आली असून ड्रोन प्लॉयींगचे काम पूर्ण झाले आहे. ७८२ गावांच्या सनद व मिळकतपत्रीका तयार करणेत आलेल्या आहेत. त्यापैकी ७५ गावात सनद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.