सारथी संस्थेमार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ
सारथी संस्थेमार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ
पुणे, दि. 17 : छत्रपती शाहू महाराज संधोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे यांच्यावतीने राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा- कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबद्ध तऱ्हेने व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचा शुभारंभ सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, माजी संचालक मधूकरराव कोकाटे, माजी संचालक नवनाथ पासलकर नव्याने सुरु करण्यात आलेल्या इनक्युबेशन केंद्रांचे पदाधिकारी व अधिकारी तसेच सारथी संस्थेचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. निंबाळकर म्हणाले, आत्तापर्यंत संपूर्ण राज्यात 12 इनक्युबेशन केंद्रांचा समावेश करण्यात आला असून यामधून अनेक यशस्वी उद्योजक तयार होत आहेत. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा गटातील नवोदित उद्योजकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास, ज्ञान आणि आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे सांगून लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार अभ्यासक्रमासाठी महिलांची प्राधान्याने निवड करावी, असेही श्री. निंबाळकर म्हणाले.
श्री. काकडे यांनी प्रास्ताविकात इनक्युबेशन उपक्रमाबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले या नवउद्योजकांना एक वर्षासाठी 25 हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसाय कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी इनक्युबेशन केंद्रामध्ये मार्गदर्शन, कार्यालयीन जागा, तंत्रज्ञान, प्रशासकीय सहाय्य, सॉफ्टवेअर सुविधा, बैठकीसाठी सभागृह आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे सांगून निवड झालेल्या लाभार्थ्यांनी स्टार्टअपच्या अनोख्या कल्पना सादर कराव्यात, असे आवाहन श्री. काकडे यांनी केले.
यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत पाच नवीन इनक्युबेशन केंद्राद्वारे प्रशिक्षण, सरसेनापती प्रतापराव गुजर सारथी अधिछात्रवृत्ती संशोधन प्रबंध सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, स्पर्धा प्रशिक्षण, महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत सीओईपी मधील कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. इनक्युबेशन केंद्रांमध्ये एमआयटी, लोणीकाळभोर, आयसर, पुणे, बारामती फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील एफ.एम.सी.आय.आय.आय. इनक्युबेशन केंद्रांचा समावेश आहे.